पुणे : तीन ठिकाणी जबरी चोर्‍या; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : तीन ठिकाणी जबरी चोर्‍या; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील कोरेगाव पार्क, वडगाव व हडपसर परिसरात जबरी चोरीच्या तीन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात जबरी चोरी करणार्‍या चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. दुचाकीस्वार चोरटे तर काही सेकंदांत नागरिकांच्या हातातील किमती ऐवज हिसकावून पळ काढत आहेत. बोलण्याचा बहाणा करून तरुणीची पर्स हिसकाविणार्‍या दोघा चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे.

परशुराम अशोक विटकर (वय 20), मुसा आबू शेख (वय 20, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी दोघांची नावे आहेत. तर, त्यांच्या अन्य एका फरार साथीदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंढवा येथील एका 28 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुण हा त्याच्या मैत्रिणीसोबत शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे बोलत थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बोलण्याचा बहाणा करून तरुणाच्या मैत्रिणीच्या हातातील पर्स हिसकावली.

त्यामध्ये सोन्याचे गंठण, मोबाईल, रोकड असा 47 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी दुपारी भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर चरवडवस्ती येथे घडली. तसेच, हडपसर इंडस्ट्रिअल एरियातून फोनवर बोलत निघालेल्या एका व्यक्तीचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सुनीलकुमार सिंह (वय 40, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

Back to top button