पुणे : चूक असतानाही अपघातात भरपाई | पुढारी

पुणे : चूक असतानाही अपघातात भरपाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अपघाताला जबाबदार म्हणून गुन्हा दाखल असतानाही मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सव्वाचार लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. मृताच्या वतीने आई-वडिलांनी अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत मोटर वाहन कायदा 163 (अ) प्रमाणे नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार यावर निकाल झाला. कुटुंबीयांनी साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती सव्वाचार लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर, अ‍ॅड. व्ही. यू. काळे, अ‍ॅड. जयश्री वाकचौरे यांच्या पॅनेलसमोर हा दावा निकाली काढण्यात आला.

येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे पिकअप मालक आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये ही घटना घडली. 18 वर्षीय युवक दुचाकीवरून चालला होता. दुचाकी पाठीमागून पिकअप गाडीला धडकली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. वडगाव मावळ येथे घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी मृत व्यक्तीवरच घटनेला जबाबदार म्हणून गुन्हा दाखल केला होता. तो अविवाहित होता. या वेळी साडेचार लाख रुपये भरपाई मागण्यात आली. मात्र, सव्वाचार लाख रुपयांवर तडजोड झाली.

Back to top button