

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'ज्या वीरांनी भगवा झेंडा भारत वर्षी नाचवला… सिंधूतीरावर अश्व दौडले, कीर्ती भिडली गगनाला… शिवरायांचे स्वप्न उराशी मुक्त करावी मथुरा-काशी… हिंदुराष्ट्र हे समर्थ करण्या रिपू रक्ताचा पडे सडा… पराक्रमाची स्फूर्ती देत असे शनवारातील हा वाडा…' अशा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा 291 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भव्य रांगोळी… सनई-चौघड्यांचे सूर आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करीत शनिवारवाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा देखील या वेळी उघडण्यात आला. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याचा 291 वा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (नि.), इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, सूर्यकांत पाठक, सचिव कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, विद्याधर नारगोलकर, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, उमेश देशमुख आणि पेशवे कुटुंबीय उपस्थित होते.
शेटे म्हणाले, 'शनिवारवाड्याची वास्तू म्हणजे केवळ दगड-धोंडे नाहीत. 250 वर्षांचा मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर आहे. कितीतरी विजयाच्या वार्ता या शनिवारवाड्यावर आल्या. बाजीराव पेशवे यांनी पुण्याला राजधानी करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात वैभवसंपन्न आणि देखणा शनिवारवाडा बांधला. त्या वेळी केवळ पुण्यात किंवा भारतातच नाही, तर आशियातील उत्तम दर्जाचा हा वाडा होता. परंतु, या वाड्याचा उपभोग घेण्यासाठी बाजीराव पेशवे येथे थांबले नाहीत. ते सतत रणांगणावर लढले, ही देखील अभिमानाची गोष्ट आहे.'