पिंपरी: जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीत बुडून कामगाराचा मृत्यू | पुढारी

पिंपरी: जलशुद्धीकरण केंद्रातील टाकीत बुडून कामगाराचा मृत्यू

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पाण्याच्या टाकीत गाळ काढण्यासाठी उतरलेल्या एका कामगाराचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र, आकुर्डी येथे घडली. अजित सिंग (२३, रा. राजस्थान) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक परवेश शिखलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्यातील गाळ काढण्यासाठी महापालिकेने विजीन शिवतरे यांना कंत्राट दिले आहे. मृत अजित सिंग हा शिवतरे यांच्याकडे मजुरी काम करत होता. दरम्यान, महापालिकेच्या निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्यासाठी अजित सिंग पाण्याच्या टाकीत उतरले. मात्र, बराच वेळ ते बाहेर आले नाहीत. तसेच, आतून त्यांचा काही प्रतिसाद न आल्याने पाण्याची टाकी रिकामी करण्यात आली. त्यांनतर अजित सिंग यांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे रावेत पोलिसांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

सेल्फी घेताना तरुण बुडाला

मोबाईल कॅमेऱ्यात सेल्फी घेत असताना थेरगाव येथील केजुबाई बंधाऱ्यात एक तरुण बुडाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी केजुबाई बंधा-याच्या पाण्याजवळ एकजण सेल्फी घेत होता. त्यावेळी अचानक तोल गेल्याने तरुण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या वल्लभनगर आणि थेरगाव उपविभागाची दोन पथके देखील दाखल झाली असून रात्री उशिरापर्यंत तरुणाचा शोध सुरू होता.

Back to top button