पुरातुन तोल संभाळत गेल्यावर मिळते हंडाभर पाणी, जावळेवाडीच्या आदिवासी भागातील चित्र | पुढारी

पुरातुन तोल संभाळत गेल्यावर मिळते हंडाभर पाणी, जावळेवाडीच्या आदिवासी भागातील चित्र

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: ओढ्याच्या सतत वाहणाऱ्या पुरातून डोक्यावर हंडा घेऊन तोल सावरीत आल्यावर एक हंडा पिण्याचे पाणी मिळते. तर ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असले की घराच्या छतावरून ओघळून आलेल्या पावसाच्या पाण्यावर कुटुंबातील लहान-मोठ्याची तहान भागवावी लागण्याची वेळ जावळेवाडीच्या आदिवासी नागरिकांवर आली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर गळक्या छतावर तिरंगा लावुन परिसरात सतत पाऊस पडत असताना आणि शेजारी ओढे, नाले भरून वहात असताना खेड तालुक्यातील ग्रामपंचायत शिरगाव हद्दीतील मंदोशीची जावळेवाडी, केळेवाडी, गोडेवस्ती येथील आदिवासी महिलांची घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत मनाला चटका लावणारी अशीच ठरत आहे.

खेड तालुक्याच्या दुर्गम भागातील ग्रामपंचायत शिरगाव हद्दीत मंदोशीची जावळेवाडी, केळेवाडी, गोडेवस्ती ही २०० आदिवासींची वस्ती आहे. चहुबाजूंनी डोंगर, गर्द झाडीचा परिसर आणि वाहणारे ओढे, धबधबे असे वास्तव्य असलेल्या या नागरीकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सोय नाही. विहीर आहे; मात्र पुराचे पाणी त्यात वारंवार जात असल्याने ते पिण्यायोग्य राहत नाही. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ओढ्यापलीकडे असलेल्या एकमेव हाफसा पंपावरून प्यायला पाणी आणावे लागते. येथे जाऊन परत येताना ओढ्याच्या पुराच्या पाण्यातुन जीवघेणा प्रवास महिलांना करावा लागतो.

जीव धोक्यात घालून ओढ्याच्या पाण्यातून अलीकडे-पलीकडे डोक्यावर हंडा घेऊन महिला, मुले ये-जा करतात. वस्तीवर इयत्ता चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे.ओढ्याच्या पलीकडे असलेल्या काही घरातील लहान विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेत यावे लागते. पुरामुळे रस्ता वाहुन जातो. येण्या-जाण्यासाठी व जीवनाश्यक गरजांसाठी परावलंबी जीवन जगावे लागते. अनेक अधिकारी, पदाधिकारी येतात परिस्थिती पाहुन दया दाखवतात. भरभरून आश्वासन देतात मात्र काहीच कारवाई होत नाही, असे येथील रहिवासी शिरगावचे माजी सरपंच बबन गोडे, कमलाबाई गोडे,सुमन गवारी, विमल गोडे,लहू गोडे, कांताबाई गवारी, यमुनाबाई गवारी, सोमनाथ मोरमारे यांनी सांगितले. सांडभोरवाडी-काळूस गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी या ठिकाणी शनिवारी १३ ऑगस्ट रोजी भेट दिली. नागरिकांशी संवाद साधला व समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

येथील आदिवासी बांधव आजच्या घडीला अत्यंत हलाखीचे जीवन अनुभवीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ये-जा करता यावी, यासाठी ओढ्यावर ६० बाय ३ फूट लांबी व रुंदीचा लोखंडी पूल येत्या पंधरा दिवसांत उभारण्यात येईल.

– बाबाजी काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Back to top button