विद्युत रोहित्रामुळे अपघाताची भीती | पुढारी

विद्युत रोहित्रामुळे अपघाताची भीती

दापोडी : नवी सांगवी येथील सांगवी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या धोकादायक विद्युत रोहित्रामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर रोहित्र स्थलांतर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सांगवी पोलिस ठाण्याचा कामकाज हा ज्या इमारतीच्या जागेत सुरू आहे, त्या इमारतीलगत असलेल्या वाहनतळाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून महावितरण विभागाचा विद्युत रोहित्र बसविण्यात आलेला आहे.

पोलिस ठाण्यामध्ये नेहमीच कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. त्याचबरोबर ठाण्याला लागूनच सिद्धी पार्क व अथर्व रेसिडेन्सी या रहिवासी सोसायटी आहेत. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या या विद्युत रोहित्रामधून बर्‍याचदा ठिणग्या उडत असतात.
तसेच, या रोहित्रातून ऑईल गळती होत असते. भर लोकवस्तीत असलेल्या या रोहित्रामुळे या ठिकाणी जीवितहानी व वित्तहानी होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिस ठाण्यात काम करणारे कर्मचारी तसेच परिसरात असलेल्या सोसायटीतील रहिवाशांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून महावितरणने त्वरित हा रोहित्र दुसरीकडे स्थलांतर करावा, अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी
केली आहे. दरम्यान, सांगवी पोलिस ठाण्याच्या परिसरातील विद्युत रोहित्र पंधरा दिवसांत दुसरीकडे स्थलांतर करू असे विद्युत विभाग सहायक अभियंता रत्नदीप काळे यांनी सांगितले.

Back to top button