

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे जलाशयात (मल्हार सागर) गेल्या दोन वर्षांनंतर सुमारे 70 टक्के पाणीसाठा झाला आहे. या जलाशयावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणार्या 56 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटणार आहे. जेजुरीच्या माजी नगरध्यक्षा वीणा सोनवणे यांनी जलपूजन केले. गेली दोन वर्षे समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी होऊन पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले होते. जेजुरी शहराला दोन ते तीन दिवसाआड पिण्याचे पाणी दिले जात होते.
जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने नाझरे धरणात पाणीसाठा वाढत आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 496 मिमी असून, आत्तापर्यंत नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 375 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन महिने पावसाचे असून, परतीच्या पावसामुळेही या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने जेजुरीकरांना यापुढे पिण्यासाठी भरपूर पाणी उपलब्ध होईल, असे वीणा सोनवणे यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका रुक्मिणी जगताप, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, पालिका अधिकारी बाळासाहेब खोमणे, प्रसाद जगताप, राजेंद्र दोडके उपस्थित होते.