भोर; पुढारी वृत्तसेवा: भाटघर धरण (येसांजी कंक जलाशय) शुक्रवारी, (दि. 12) दुपारी दीडच्या सुमारास 100 टक्के भरले. धरणाच्या 45 स्वयंचलित दरवाजातून वेळवंडी नदी पात्रात 7200 क्युसेकने विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेने यंदा एक महिना अगोदर धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती शाखाभियंता पी. एच. डेसेल यांनी दिली.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भुतोंडे, मळे, पांगारी खोर्यात होत असलेल्या पावसाने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. जुलैअखेर धरणात 76 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. धरण क्षेत्रात 741 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भाटघर धरणाची पाण्याची क्षमता 23 टीएमसी आहे. एकूण 81 दरवाजे असून 45 स्वयंचलित, 36 अस्वयंचलित आहेत. धरण भरल्याने स्वयंचलित दरवाजातून 7200 क्युसेकने वेळवंडी धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हिर्डोशी खोर्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. निरा – देवघर धरण 96 टक्के भरले असून, येत्या दोन दिवसांत धरण 100 टक्के भरण्याची चिन्हे आहेत.