निरा : वीरच्या विसर्गाने निरेतील दत्तमंदिर अर्धे पाण्याखाली | पुढारी

निरा : वीरच्या विसर्गाने निरेतील दत्तमंदिर अर्धे पाण्याखाली

निरा; पुढारी वृत्तसेवा: वीर धरणातून गेल्या चार दिवसांपासून निरा नदीत सतत विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार वीर धरणाच्या विसर्गात वाढ होत राहिल्याने निरा नदीला पूर आला. निरा नदी किनार्‍यावरील निरा- पाडेगाव येथील प्रसिद्ध दत्तमंदिर शुक्रवारी (दि.12) अर्धे पाण्याखाली बुडाले होते. वीर धरणात पाण्याची कमालीची वाढ होऊ लागल्याने शुक्रवारी (दि.12) सकाळी साडेसहा वाजता धरणाच्या नऊ दरवाजांतून 41 हजार 733 क्युसेकने, निरा उजवा कालवा विद्युतगृहातून 900 क्युसेक व निरा डावा कालवा विद्युतगृहातून 300 क्युसेक असे एकूण 42 हजार 933 क्युसेकने विसर्ग निरा नदीत सुरू होता.

पालखी सोहळ्यात माउलींच्या पादुकांना निरा नदीवरील प्रसिद्ध श्री क्षेत्र दत्तमंदिराच्या घाटावर ज्या ठिकाणी स्नान घातले जाते, त्या घाटाच्या पाय-यांसह अर्धे दत्तमंदिर पाण्याखाली बुडाले होते. ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागले होते. वीर धरणात पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने शुक्रवारी (दि.12) सकाळी साडेअकरा वाजता विसर्ग कमी करून 32 हजार 459 क्युसेकने विसर्ग सुरू होता. शुक्रवारी (दि.12) सायंकाळी साडेसहा वाजता विसर्गात आणखी कमी करून 23 हजार 185 क्युसेक व विद्युतगृहातून 1 हजार 200 क्युसेक असे एकूण 24 हजार 385 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

Back to top button