व्हायरस अटॅकमधून सावरत ‘स्काडा’ अपडेट ; पाणीपुरवठा मॉनिटरिंगसाठी ठरतेय उपयुक्त | पुढारी

व्हायरस अटॅकमधून सावरत ‘स्काडा’ अपडेट ; पाणीपुरवठा मॉनिटरिंगसाठी ठरतेय उपयुक्त

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : पाणी वितरणातील दोष दूर करण्यासाठी तसेच समान, नियमित पाणीपुरवठ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 12 वर्षांपूर्वी कार्यान्वित केलेल्या स्काडा यंत्रणेवर दोन महिन्यांपूर्वी व्हायरस हल्ला झाला. त्यामुळे रीडिंग येत नव्हते; मात्र त्यातून सावरत फायर वॉल प्रोटेक्शन यंत्रणा बसवून ही प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणीही डेटा हॅक करू शकणार नाही, असा
पालिका प्रशासनाचा दावा आहे.

पिंपरी-चिंचवडवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. पालिका पवना धरणातून दररोज 500 ते 510 ‘एमएलडी’ पाणी उचलते व शहरवासीयांना पाणीपुरवठा करते. सर्वांना पाणी मिळावे यासाठी पालिकेच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी रावेत येथील पंपिंग स्टेशनवरून पाणी उचलले जाते. तेथून निगडीतील शुद्धिकरण केंद्रात पाणी आणले जाते. त्यावर शुद्धिकरण प्रक्रिया करून वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या टाक्यांत पाणी साठवले जाते. त्यानंतर प्रमुख जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

पाणीपुरवठा करताना पालिकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काही भागात नियमितपणे आणि जादा वेळ पाणीपुरवठा होतो, तर काही भागात अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठ्याविषयी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याची माहिती मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तर पालिकेला लोकांच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्व प्रभागांमध्ये पुरेशा दाबाने आणि समान पाणीवाटप होण्यासाठी तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांच्या कार्यकाळात ‘स्काडा’ या अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब करण्याचे ठरविले.

‘स्काडा’मुळे रावेत जलउपसा केंद्रातील पाण्याची पातळी, गढूळता, प्रवाह, पाण्यामध्ये क्लोरीन मिसळणे आणि पाण्याची गुणवत्ता या बाबींवर नियंत्रण राहील. याखेरीज टाक्यांमधील पातळी प्रवाह आणि दाब यावरील नियंत्रण राहील. पाणीपुरवठ्यासाठी रावेत येथील उपसा केंद्रामध्ये किंवा एखाद्या टाकीत पातळी कमी झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना संदेश पाठविण्याचे काम या यंत्रणेमार्फत होईल, असे सांगण्यात आले.

‘स्काडा’ ही स्वयंचलित यंत्रणा घेण्यासाठी महापालिकेने ऑगस्ट 2009 मध्ये निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार मेसर्स इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड सिस्टीम कंपनीने 12 कोटी 23 लाख रुपयात यंत्रणा बसवून देण्याची तयारी दर्शवली; तसेच 7 वर्षे देखभाल दुरुस्तीची हमी घेतली. या यंत्रणेसाठी सेक्टर क्र. 23 येथे मध्यवर्ती कक्ष उभारला. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प राबविण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या सर्व बाबींसाठीच ‘स्काडा’ यंत्रणेचा अवलंब करणारी पिंपरी- चिंचवड महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली; मात्र दोन महिन्यांपूर्वी व्हायरस हल्ला झाल्याने यंत्रणेत बिघाड झाला.

सुमारे दोन तास रीडिंग येत नव्हते. त्यामुळे डेटा हॅक केला की काय अशी शंका निर्माण झाली. त्यावर फायर वॉल प्रोटेक्शन यंत्रणा बसविण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेचे मॉनिटरिंग करण्यासाठी स्काडा यंत्रणा पूर्ववत अन् अद्ययावत झाली असून ती अतिशय उपयुक्त ठरत आहे.

पाणीपुरवठा व्यवस्था मॉनिटरिंग करण्यासाठी, वितरणातील दोष दूर करण्यासाठी; तसेच समान पाणीपुरवठ्यासाठी स्काडा यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. कुठल्या ग्रॅव्हीटीने पाणी येते, पुढे पाणी शुद्धीकरण केल्यानंतर कुठल्या भागात किती पाणी गेले, हे स्काडा यंत्रणेमुळे समजते. दोन महिन्यांपूर्वी व्हायरस हल्ला झाला होता; मात्र त्यावर उपाययोजना करण्यात आली. फायर वॉल प्रोटेक्शन यंत्रणा उभारण्यात आल्याने आता हा डेटा कोणीही हॅक करू शकणार नाही.
                         -श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Back to top button