महादेव मंदिर सांडपाण्याच्या विळख्यात | पुढारी

महादेव मंदिर सांडपाण्याच्या विळख्यात

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: मगरपट्टा चौकातील श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिरासमोर गेल्या महिनाभरापासून ड्रेनेजचे सांडपाणी वाहत आहे. त्यामुळे परिसराला बकालपणा आला असून या सांडपाण्याचा त्रास श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनसाठी आलेल्या भाविकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील काम तातडीने पूर्ण करून भाविकांची यामधून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मगरपट्टा मुख्य चौकातील पुलाखाली एका बाजूने मुख्य रस्ता तर दुसर्‍या बाजूला लोहिया उद्यानाला लागून श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मंदिरात दिवसभर दर्शनासाठी गर्दी होत असते.

अनेकवेळा दर्शनासाठीची रांग मंदिराबाहेर पदपथावर येत असते. मात्र, गेल्या महिनाभरापासून येथून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रस्त्यावर वाहत असलेल्या पाण्यात उभे रहावे लागते. ड्रेनेजच्या पाण्याच्या दुर्गंधीसह डास, माशांचा त्रासही सहन करावा लागत आहे.

स्थानिक रहिवासी बाळासाहेब माने व संजय भोसले म्हणाले, ‘श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर हडपसर’ गावचे पारंपरिक एकमेव शिवमंदिर आहे. त्यामुळे, येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने पंचक्रोशीतील नागरिक येथे दर्शनासाठी येत आहेत. त्यांना सांडपाण्यातून मंदिरात जावे लागत आहे.’ त्यावर, मंदीरा समोर मुख्य पालिकेच्या खात्याकडुन काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालिका सहाय्यक आयुक्त शाम तारू यांनी दिली.

Back to top button