पिंपरी : उद्यान विभाग खरेदी करणार दोन कोटींची रोपे | पुढारी

पिंपरी : उद्यान विभाग खरेदी करणार दोन कोटींची रोपे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या वतीने शहर परिसरात झाडे लावण्यात येणार आहेत. ती रोपे उद्यान, रस्ते व नर्सरीत लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 2 कोटींचा खर्च केला जाणार आहे. पालिकेच्या वतीने देहूरोड व दिघी येथील लष्करी जागेत एक लाखापेक्षा अधिक झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाच्या वन विभागास पालिका कोट्यवधी रुपये देणार आहे; तसेच शहरात विविध ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत.

सन 2022-23 वर्षांसाठी मोठी रोपे पुरविण्यासाठी न्यू गार्डन गुरूज फार्म अ‍ॅण्ड नर्सरीला 48 लाख 51 हजार खर्च दिला जाणार आहे. रस्ते उद्यानामध्ये लागवडीसाठी रोपे लावण्यासाठी 48 लाख 51 हजार खर्च आहे. ती रोपे जी. बी. एन्टप्रायजेसकडून खरेदी केले जाणार आहेत. पालिकेच्या उद्यानांमध्ये लागवडीसाठी शोभिवंत रोपे पुरविण्यासाठी 48 लाख 51 हजार खर्च आहे. ही रोपे बीव्हीजी इंडियाकडून खरेदी केले जाणार आहेत. पालिकेच्या नर्सरीमधील कुंड्यामध्ये लागवडीसाठी शोभिवंत रोपे पुरविण्यासाठी 49 लाख 500 रूपये खर्च आहे. ही रोपे निगर्स लॅण्डस्केप प्रा. लि.कडून खरेदी केले जाणार आहेत.

खड्डे खोदणे, माती भरण्यासाठी 23 लाख, बोअरवेलसाठी 44 लाख
शहरात विविध ठिकाणी झाडे लावण्यासाठी खड्डे घेणे व माती टाकण्यासाठी 31 लाख 67 हजार 968 खर्चाची निविदा काढली होती. अनुज बोरूडे यांची 49.99 टक्के कमी दराची 22 लाख 24 हजार खर्चाची निविदा पात्र ठरली आहे. या कामाची मुदत सहा महिने आहे; तसेच, उद्यान विभागासाठी उद्यानात पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या बोअरवेल दुरूस्त करणे व आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेलसाठी 24 महिने कालावधीसाठी 44 लाख 14 हजार खर्च करण्यात येणार आहेत.

Back to top button