पुणे : मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर यावे; डॉ. बाबा आढाव यांचे आवाहन | पुढारी

पुणे : मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर यावे; डॉ. बाबा आढाव यांचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘आरोग्य, शिक्षण आणि रोजगार आदींचे प्रश्न आता केवळ मांडून थांबायचे नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला शेवटची मुदत देत आहोत. सरकारने याबाबत पावले उचलली नाहीत, तर जनतेला रस्त्यावरची लढाई सुरू करावी लागेल,’ असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी दिला. राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने क्रांती सप्ताह, जन की बात, हर घर तिरंगा, हर घर संविधान असे अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम झाली पाहिजे, डॉक्टर, शिक्षक व आरोग्य कर्मचार्‍यांची पदे तातडीने भरली पाहिजेत.

शहरी रोजगार हमी योजना लागू केली पाहिजे, नवीन शिक्षण धोरण रद्द केले पाहिजे आदी मागण्यांसाठी ही निदर्शने केली.
यावेळी राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, जन आरोग्य अभियानचे डॉ. अनंत फडके, डॉ. अभय शुक्ला, समाजवादी शिक्षण हक्क सभेचे शरद जावडेकर, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयक सुहास कोल्हेकर, आरोग्य सेनेचे पदाधिकारी हनुमंत बहिरट, लक्ष्मीकांत मुंदडा, युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर, लोकायत कल्याणी मनस्विनी रवींद्र, निखिल रांजनकर आदी उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्य व रोजगार हे नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत. मात्र, देशाच्या 75 वर्षांनंतर ही नागरिकांना हे हक्क मिळू शकत नाहीत. स्वातंत्र्याच्या लढ्यापेक्षा परिवर्तनाचा लढा अधिक अवघड आहे. आता परिवर्तनासाठी कृती केली नाही, तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही.
                                                – बाबा आढाव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Back to top button