पुणे : राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी सप्टेंबरअखेरची मुदत | पुढारी

पुणे : राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी सप्टेंबरअखेरची मुदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या केंद्र शासनाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठी एनएसपी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरावेत, असे आवाहन योजना संचालनालयाचे संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी केले आहे. शिष्यवृत्तीसंदर्भात माहिती देताना संचालक डॉ.पाटील म्हणाले, ‘प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नूतनीकरणासाठी 7 लाख 84 हजार 201 पात्र विद्यार्थी आहेत. चालू शैक्षणिक वर्षात नवीन पाच लाख अर्ज अपेक्षित आहेत.

नवीन व नूतनीकरण मिळून 13 लाख अर्जांचे उद्दिष्ट संचालनालयाने ठेवले आहेत, तर बेगम हजरत महल यांच्या नावे नववी ते बारावीमधील मुलींसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी 60 हजार अर्जांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही शिष्यवृत्ती नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पसंख्याक समाजातील फक्त मुलींसाठी आहे. धार्मिक अल्पसंख्याक समाजातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मान्यताप्राप्त शासकीय, निमशासकीय व खासगी आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आहे. निवड झाल्यास 1000 रुपये ते 10,000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती रक्कम मिळते.

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक
पोर्टलवर अर्ज भरण्यास सुरुवात : 20/07/2022
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 30/09/2022
शाळा स्तरावरून अर्ज पडताळणी करण्याची
शेवटची तारीख 16/10/2022.
जिल्हा स्तरावरील अर्ज पडताळणी अंतिम दिनांक 31 /10/2022

प्री-मॅट्रिक आणि बेगम हजरत महल शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र राज्यातून दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे, उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.
                                       -डॉ. दिनकर पाटील, संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य

 

Back to top button