पुणे : तीन पोलिस अधिकार्‍यांना ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदक | पुढारी

पुणे : तीन पोलिस अधिकार्‍यांना ‘केंद्रीय गृहमंत्री’ पदक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे ग्रामीण पोलिस दलातील तिघा पोलिस अधिकार्‍यांना केंद्रीय गृहविभागाकडून उत्कृष्ट तपासासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ (सन 2022) जाहीर झाले आहे. त्यामध्ये पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सुरेशकुमार राऊत व सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी या सर्व अधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे. क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास उत्कृष्टरीत्या करणार्‍या तपासी अधिकारी यांना भारत सरकारच्या गृह विभागाकडून केंद्रीय गृहमंत्री पदक दरवर्षी प्रदान केले जाते. पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून चार तपासी अधिकार्‍यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला होता.

दहा दिवसांत तपास
पोलिस निरीक्षक दिलीप पवार हे लोणावळा शहर येथे प्रभारी अधिकारी असताना लोणावळा शहर पोलिस ठाण्यात असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्वक केला होता. आरोपींनी डॉ. खंडेलवाल यांच्या घरावर दरोडा टाकला होता. यातील आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. पवार व त्यांच्या पथकाने 10 दिवसांच्या आत या गुन्ह्याची उकल केली.

बँक दरोड्याचा छडा
पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरूर येथे प्रभारी अधिकारी असताना भरदिवसा बँकेवर पडलेल्या दरोड्याचा तपास करून त्यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. तसेच दरोडेखोरांनी चोरी केलेला तब्बल 2 कोटी 36 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता. बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड, ता. शिरूर येथे बँकेचे कर्मचारी व ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता.

नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा येथे प्रभारी अधिकारी होते. त्यावेळी एक लहान मुलगी हरविल्याच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसर्‍या दिवशी मुलगी मृतावस्थेत सापडली होती. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार होऊन तिचा मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला होता. पवार यांनी सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला 48 तासांत जेरबंद केले होते. आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

Back to top button