पुणे : तुळशीबाग, मंडईत तिरंगा रॅली; कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती | पुढारी

पुणे : तुळशीबाग, मंडईत तिरंगा रॅली; कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘भारत माता की जय’च्या जयघोषात हातात तिरंगी ध्वज घेऊन श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरापासून तिरंगा रॅली काढण्यात आली. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत महाआरती करून रॅलीला प्रारंभ झाला. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सुरू झालेल्या रॅलीत नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यावतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, आयोजक हेमंत रासने, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, राजेश येनपुरे, अनिल बेलकर, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, सौरभ रायकर आदींसह शेकडो नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती झाल्यानंतर बेलबाग चौकामार्गे मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे मार्गस्थ झाली. तुळशीबाग राममंदिर व तुळशीबाग गणपती मंदिरात दर्शन घेत पुढे लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाजवळ रॅलीचा समारोप झाला. यादरम्यान पथारी व्यावसायिक व तुळशीबागेतील व्यापार्‍यांनादेखील तिरंगी ध्वज देण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अनेक स्वातंत्र्यसेनानींचा सहभाग होता. अनेक ऐतिहासिक ठिकाणेदेखील या परिसरात आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणाला मानवंदना देत ही रॅली काढण्यात आली.

                                                                     – हेमंत रासने, आयोजक

Back to top button