टीईटी घोटाळा : 50 हजार प्रमाणपत्रे ‘ईडी’ तपासणार; राज्यातील आजी-माजी शिक्षणाधिकारी, दलाल रडारवर

टीईटी घोटाळा : 50 हजार प्रमाणपत्रे ‘ईडी’ तपासणार; राज्यातील आजी-माजी शिक्षणाधिकारी, दलाल रडारवर
Published on
Updated on

दिनेश गुप्ता/गणेश खळदकर

पुणे : टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) घोटाळ्याचा तपास 'ईडी'कडे गेल्याने ईडीच्या तपासाची व्याप्ती वाढली असून मंत्रालयातील अनेक बडे अधिकारी या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'ईडी'ने या प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवली असून 50 हजार टीईटी प्रमाणपत्रांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, राज्यभरातील कार्यरत आणि माजी शिक्षणाधिकार्‍यांनी बनावट टीईटी प्रमाणपत्रांना मंजुरी दिल्याने हे शिक्षणाधिकारीही ईडीच्या रडारवर आले आहेत. या घोटाळ्यात उमेदवार आणि अधिकारी यांच्यात दुवा म्हणून काम करणारे अनेक दलाल पसार झाले आहेत. या दलालांचाही शोध घेतला जात आहे.

उत्तरपत्रिकेत बारकोड नसल्याचा फायदा उचलून दलालांमार्फत तयार केलेल्या बनावट प्रमाणपत्रांना मंजुरी देणार्‍या शिक्षणाधिकारी, एजंट आणि हेराफेरी करणार्‍या औरंगाबादच्या झेरॉक्स सेंटर चालकांवर तपास यंत्रणांची नजर आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारात 40 हून अधिक जणांना आतापर्यंत अटक केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीईटी परीक्षा घोटाळ्यात अनेक शिक्षणाधिकार्‍यांनी खोडवेकर यांना जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे. ही सर्व 'आयडियल' खेळी या औरंगाबादच्या नाथ मार्केटमधील झेरॉक्स सेंटरमधून खेळली जात होती. प्रमाणपत्रावर बारकोड नसल्याने नापास झालेल्यांच्या प्रमाणपत्रावर हेराफेरी करून पास असल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यात यायचे.

रिचेकिंगची खेळी
परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांना रिचेकिंगसाठी अर्ज करण्यास सांगून पुणे आणि मंत्रालयातून मंजुरी आणली जात होती. 2014 पासून सुरू असलेल्या या खेळीत अनेक बनावट अ‍ॅप्रुव्हल देण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासात ही सर्व हेराफेरी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'ढमाल'गिरी करणारा क्लार्कही रडारवर
पुण्यातील महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचा 'धमाल' उडवीत काम करणारा क्लार्क पोलिसांच्या नजरेतून सध्या तरी सुटला आहे. राज्यभर हा घोटाळा चर्चेत आल्यानंतर 'तो मी नव्हेच' अशा आविर्भावात 'ढमाल'गिरी करणारा हा क्लार्क आता ईडी रडारवर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली जाणार आहे.

बेरोजगार असलेल्यांचीही प्रमाणपत्रे तपासणार
अपात्र परीक्षार्थ्यांना टीईटी परीक्षा पात्रतेचा निकाल देण्यासाठी प्रत्येकी लाखो रुपये घेण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. आतापर्यंत 7200 जणांनी पैसे देऊन टीईटीची अशी बोगस प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्यापैकी काही जण शिक्षक म्हणून रुजूही झालेले आहेत, पोलिस त्यांचाही शोध घेत असून त्यांच्याविरोधातही लवकरच कारवाई केली जाणार आहे. तर डी.एड. पास विद्यार्थ्यांनी नोकरी मिळण्याच्या आशेवर टीईटी प्रमाणपत्र घेऊन ठेवलेल्या 50 हजारांहून अधिकांचे प्रमाणपत्रही तपासले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त शिक्षणाधिकार्‍यांसह मराठवाडा, खानदेश व विदर्भातील अनेक शिक्षणाधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

सर्व रजिस्टर ताब्यात घेण्याचे काम 'ईडी'कडून सुरू
2013 पासून टीईटी घोटाळा उघड होईपर्यंत प्रत्येकवेळी जावक क्रमांक नवीन दाखवून सोयीनुसार नोंद केली आहे. हे सर्व रजिस्टर ताब्यात घेण्याचे काम ईडीकडून सुरू करण्यात आल्याने अधिकार्‍यांसह दलालांचे धाबे दणाणले आहेत. याशिवाय अनेक वर्षांपासून क्लार्क व वरिष्ठ क्लार्क एकाच जागी कसे, याचाही तपास सुरू झाला आहे. सेवेत रुजू झाल्यापासून कोण कोण कर्मचारी याच जागेवर होते, त्यांची यादी तयार केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दलालांच्या 'खासगी कोड' संकेतामुळे दिली जात असे तत्काळ मंजुरी
दलालामार्फत आलेल्या प्रमाणपत्रावर 'खासगी कोड' टाकलेला असल्यामुळे त्याला शिक्षणाधिकारीदेखील मंजुरी देत असे. एजंटांनी मराठवाड्यासह खानदेश आणि विदर्भातील शेकडो मुलांना बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. एजंटांनी उर्दू माध्यमातील अधिक शिक्षकांची बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्याची मंजुरीही आणली आहे. या सर्व घोटाळ्यात एजंट, शिक्षणाधिकारी आणि झेरॉक्स सेंटरचालक यांच्या सह्यांचे बारीक कोड एका कोपर्‍यात असायचे. यामुळेच त्यांच्याकडून आलेला प्रत्येक प्रस्ताव मंजूर केला जायचा.

  • 'ईडी'ने चौकशीची व्याप्ती वाढवली
  • अनेक दलाल पसार
  • आतापर्यंत 40 जणांना अटक
  • अनेकांचा कसून शोध
  • 7 हजार 200 बनावट प्रमाणपत्रे उघड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news