

पुणे, पुढारी वृत्तसेवा : आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री होते, त्यातील एकालाच मंत्रीमंडळात स्थान दिले असते, तर वेगळा संदेश जाऊ शकला असता. बच्चू कडू हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसर्या टप्प्यात ठेवला जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
केसरकर शुक्रवारी पुणे दौर्यावर होते. त्याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना केसरकर यांनी उत्तरे दिली. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हा आरोप कित्येक महिन्यांपूर्वी केला गेला होता, जी चौकशी झाली, त्यात राठोड कुठेही दोषी आढळलेले नाहीत. त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात आलेला नाही. महिलांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भावना आहे. जर चित्रा वाघ म्हणत असतील की, या प्रकरणात अधिक चौकशी झाली पाहिजे तर, ती चौकशी देखील होईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
आमच्यातील 15-20 लोक परत येणार, परंतु प्रत्यक्षात आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा त्यांच्यात असलेल्यांपैकी एक कमी झाला आणि आम्ही जर एकत्र राहिलो तर आणखी कितीतरी लोक कमी होणार आहेत. कारण, लोकांची कामे होत नव्हती ना? परंतु उठाव करायला एक धैर्य लागते, प्रसंगी ते धैर्य ते दाखवू शकले नाहीत, नाहीतर एक दोन वगळता सगळेच्या सगळे आमदार या उठावात सहभागी झाले असते, याची मला खात्री, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.