पुणे : बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या घराला आग | पुढारी

पुणे : बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या घराला आग

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक व नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या भोई गल्लीनजीकच्या राहत्या घराला आग लागली. आगीत मोठे नुकसान झाले आहे. खासकरून गुजर यांनी आजवर जीवापाड जपलेला दुर्मिळ ठेवा या आगीत खाक झाला आहे.

जळालेला किमती दस्तावेज

 

गुजर हे विद्यार्थी दशेपासूनच नाट्य, साहित्य क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या जुन्या तबकड्या, ग्रामोफोन, जुन्या सीडी, विविध पुस्तकांचा मोठा ठेवा होता. ज्या खोलीत त्यांनी हे साहित्य ठेवले होते, त्याच खोलीला आग लागली. त्यात हा अनमोल ठेवा जळाला. याशिवाय अन्य काही वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या.

शुक्रवारी (दि. १२) गुजर हे नटराज नाट्य कला मंडळात थांबले असताना त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. नटराजचे अनेक सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत एका खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले. अन्य मजल्यांवर आग पोहोचू नये, यासाठी अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठा धोका टळला. परंतु आगीत जुने साहित्य, दुर्मिळ ठेवा जळून खाक झाला.

सन १९८९ पासून निवडणूक आयोगाच्या विविध परिपत्रक, आदेश गुजर यांनी सांभाळून ठेवले होते. तेदेखील आगीत जळाले. सुमारे ३५ लाख रुपयांहून अधिकचे नुकसान आगीत झाले. दरम्यान ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Back to top button