आगाखान पॅलेस येथे शुक्रवारी झालेल्या स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याचे दीपप्रज्वलन करताना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील व आदी.
आगाखान पॅलेस येथे शुक्रवारी झालेल्या स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याचे दीपप्रज्वलन करताना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील व आदी.

महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने आगाखान पॅलेस प्रेरणादायी ठरले : कपिल पाटील

Published on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधीजींचे आगाखान पॅलेसमध्ये वास्तव्य राहिले, त्यामुळे ही वास्तू स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली. या वास्तूचे संवर्धन करतानाच ही वास्तू देशासाठी सर्वस्व देणार्‍या आगाखान यांच्या आठवणीही पुरातत्व विभागाने जपाव्यात, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

घरोघरी तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय पंचायतराज आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आगाखान पॅलेस येथे शुक्रवारी (दि.12) आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याअंतर्गत पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, पंचायतराज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजय कुमार बेहरा, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ.राजेंद्र यादव, गांधी मेमोरियल सोसायटीच्या नीलम महाजन आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी गौरवाची भावना निर्माण होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 75 आठवडे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे हा भाग्याचा क्षण आहे. स्वतंत्र भारताला विकासाची दिशा दाखविणारा आणि नव्या पिढीला देशासाठी त्यागाची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाची माहिती आणि देशाच्या प्रगतीसाठी आपल्या क्षमतेचा उपयोग करावा. याची प्रेरणा देण्यासाठी 'घरोघरी तिरंगा' तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन देशभर होत आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

लवकरच संग्रहालय सुरू होणार…

आगाखान पॅलेस नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे. केंद्र सरकारकडून या वस्तूच्या विकास आणि संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. लवकरच येथे संग्रहालय सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित 5 गडावर स्वराज्य महोत्सवाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news