यशस्वी विद्यार्थ्यांचा उद्या ‘एमआयटी’ करणार सन्मान; कोथरूड येथील प्रांगणात कार्यक्रम | पुढारी

यशस्वी विद्यार्थ्यांचा उद्या ‘एमआयटी’ करणार सन्मान; कोथरूड येथील प्रांगणात कार्यक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा 2020-21 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी पुणेतर्फे सत्कार आयोजित करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मिलिंद पांडे, प्रा. डॉ. शालिनी शर्मा आणि डॉ. के. गिरीसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानिमित्ताने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचा उद्घाटन समारंभ शनिवारी (दि. 13) सकाळी 9 वाजता कोथरूड येथील एमआयटीच्या स्वामी विवेकानंद सभामंडपात होणार आहे.

या समारंभासाठी भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा, राज्यसभेचे माजी महासचिव व राज्यसभा सचिवालयाचे सल्लागार डॉ. पी. पी. के. रामचार्युलू, भारताच्या गृहमंत्रालयाच्या नॅशनल क्राईम ब्युरोचे संचालक रामफाल पवार व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माजी अध्यक्षा मंजुला दास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.

या परीक्षेत भारतातून तिसरी आलेली गामिनी सिंगला हिचा सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्त 51 हजार रुपयांचे पारितोषिक तसेच शाल व श्रीफळ देण्यात येणार आहे. सोहळ्याचा समारोप सोमवारी (दि. 15) सकाळी 9.30 वाजता होणार आहे. या समारंभासाठी मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेचे उपमहासंचालक डॉ. बिपीन बक्षी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Back to top button