पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन | पुढारी

पीडितेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

तळेगाव दाभाडे : कोथुर्णे घटनेतील बालिकेला न्याय देण्यासाठी सरकारच्यावतीने चांगला वकील देण्यात येणार आहे. तसेच, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कोथुर्णे गावात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ व नागरिकांच्यावतीने पवनानगर बाजारपेठेत उपोषण करण्यात आले होते.

याची दखल घेत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी बजरंग दलाचे शिष्टमंडळ माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे निवेदन दिले, त्यावेळी उपुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.

याप्रसंगी संदेश भेगडे, भाजपसंघटन मंत्री गणेश ठाकर, गणेश सावंत, बजरंग दलाचे सहसंयोजक बाळा खांडभोर, प्रशांत ठाकर, सुनील ढोरे यांसह अनय् मान्यवर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला शासनाच्यावतीने मदत केली जाईल.

पीडित कुटुंबीयांच्या भाजप पाठीशी
कोथुर्णे येथील घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभे असून, त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासन बाळा भेगडे यांनी दिले.

Back to top button