पुणे : गाड्यांसाठी वेटिंग पे वेटिंग…! पूर्ण पैसे मोजूनही मुहूर्तावर मिळेनात चारचाकी | पुढारी

पुणे : गाड्यांसाठी वेटिंग पे वेटिंग...! पूर्ण पैसे मोजूनही मुहूर्तावर मिळेनात चारचाकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नवी गाडी खरेदी करायचीय…? तीही मुहूर्तावरच! यंदा मात्र पूर्ण पैसे मोजूनही पुणेकरांना शोरूममधून नवी गाडी सणासुदीच्या मुहूर्तावर मिळेल याची खात्री नाही. नव्या गाड्यांच्या ‘वेटिंग पे वेटिंग’ प्रकारामुळे पुणेकर नागरिक निराश झाले आहेत.
येत्या काही दिवसांत अनेक सण आहेत. या सणासुदीच्या दिवशी पुणेकरांचे नव्या गाड्या घरी आणायचे नियोजन आहे. मात्र, शोरूममध्ये असलेल्या गाड्यांच्या वेटिंगमुळे नागरिकांना गाड्या वेळेत मिळतील की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बहुतांश गाड्यांना वर्षभराचे, तर काही गाड्यांना सहा, नऊ, पाच, तीन महिन्यांचे वेटिंग आहे. यामुळे पुणेकर नागरिक अक्षरश: हैराण झाले असून, ज्या गाड्या सध्या शहरात खूप चर्चेत आहेत, त्याच गाड्यांना वेटिंग आहे. यामुळे नागरिकांना मनपसंतीची गाडी खरेदी करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

‘इलेक्ट्रिक’ही मिळेनात
इंधनावरील इर्टिगा, थार, क्रेटा, ब्रेझा, ग्रँड व्हिटारा, ऑटो स्वीफ्ट यांसारख्या अनेक गाड्यांना वेटिंग आहेच; शिवाय इलेक्ट्रिकवरील बजाज चेतक, रिव्हॉल्ट, नेक्सॉनसारख्या गाड्यांनादेखील वेटिंग आहे. त्यामुळे गाड्या खरेदी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
चारचाकी, दुचाकी गाड्यांसाठी लागणारे बरेचसे साहित्य, स्पेअर पार्ट रशिया-युक्रेनमधून आयात होतात. मात्र, तेथील युद्धामुळे गाड्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे गाड्यांचा पुरवठा कमी होत आहे. याचा परिणाम नव्या गाड्यांच्या वेटिंगवर झाला आहे, असे विक्रेत्यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

कंडक्टर चीपचा तुटवडा
जगभरात चीन, जपान आणि तैवान या तीनच देशांमध्ये गाड्यांसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर चीप बनतात. मात्र, या चीपचा तुटवडा सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्याच्या इंधनासह इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये ही चीप बसविणे आवश्यक आहे. मात्र. त्यांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नव्या गाड्यांना वेटिंग आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांसाठी एक चांगली गाडी खरेदी करायची होती. अनेक शोरूममध्ये जाऊन आलो. बहुतांश गाड्यांना वेटिंग आहे. त्यामुळे आता गाडी खरेदी केली, तरी ती दिवाळीतच मिळणार आहे. आम्हाला गणेशोत्सवात हवी होती. मात्र, गाड्यांच्या वेटिंगमुळे हे शक्य दिसत नाही.
                                                                      दत्तात्रय भोसले, हडपसर

जगभरात इलेक्ट्रॉनिक्स चीपचा तुटवडा निर्माण झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे लागणारे रॉ मटेरिअल, स्पेअर पार्ट वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बर्‍याचशा गाड्यांना सहा महिने, वर्षभर असे वेटिंग आहे. मात्र, आमच्याकडून नागरिकांना वेळेत गाड्यांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

– नीरज कुदळे, व्हाईस प्रेसिडेंट, फेडरेशन ऑफ अ‍ॅटोमोबाईल डीलर असोसिएशन, पुणे

इंधनावरील दुचाकींचे रजिस्ट्रेशन पूर्वीप्रमाणे सुरू आहे. फक्त चारचाकी नव्या गाड्यांच्या खरेदीला नागरिकांना समस्या येत असतील. कारण इलेक्ट्रॉनिक्स चीपचा तुटवडा आहे. ज्या ज्या ब्रँडच्या गाड्या आहेत. त्यांचे प्रॉडक्शन कमी झाले असेल. याचा परिणाम
होऊ शकतो.
                              – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 

Back to top button