पुणे : प्राध्यापक भरती आता शंभर टक्के; उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची घोषणा | पुढारी

पुणे : प्राध्यापक भरती आता शंभर टक्के; उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची घोषणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘स्वायत्त महाविद्यालयांत शंभर टक्के प्राध्यापक पदभरतीचे धोरण लवकरच आणणार आहे,’ अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चतर्फे आयोजित एका कार्यक्रमात डॉ. माने बोलत होते. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, विश्वस्त जगदीश कदम, आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यांची प्रमुख
उपस्थिती होती.

डॉ. माने म्हणाले, ‘ज्ञानाचा प्रचार, प्रसार, निर्मिती आणि संवर्धन करण्यासाठी शिक्षणाची समाजाशी नाळ जोडली पाहिजे. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) वाढविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्कता आहे.’ कुंटे म्हणाले, ‘पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रबळ इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवावी लागेल. निर्यातीचा वेग वाढवून आयात कमी केली पाहिजे.

त्यासाठी आवश्यक संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. शिक्षणाचे सक्षमीकरण, स्वयंरोजगाराला प्राधान्य, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था, सांस्कृतिक परंपरांची जागृती व प्रबळ इच्छाशक्तीद्वारे समृद्ध आणि संपन्न भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.’ डॉ. जैन यांनी प्रास्ताविक, तर डॉ. प्रतीक्षित महांकाळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रृती नागर यांनी परिचय करून दिला. प्रा. प्रज्ञा महाजन यांनी
आभार मानले.

लवकरच ‘फर्ग्युसन’ची पदवी
फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वायतत्ता मिळाली असली तरी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र दिले जाते. लवकरच फर्ग्युसनला स्वत:चे पदवी प्रमाणपत्र देता येईल. तो दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणार्‍या यादीत फर्ग्युसनचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना फर्ग्युसनचे पदवी प्रमाणपत्र मिळू शकेल, असे सुतोवाच डॉ. माने यांनी केले.

Back to top button