राजगड खोर्‍यात मुसळधार गुंजवणी वाहू लागले | पुढारी

राजगड खोर्‍यात मुसळधार गुंजवणी वाहू लागले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : तोरणा, राजगड खोर्‍यासह वेल्हे तालुक्यात बुधवारी (दि. 10) सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तोरणागड पायथ्याच्या धानेप येथील गुंजवणी धरण शंभर टक्के भरून वाहू लागले आहे. धरणातून 3040 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कानदी, गुंजवणी नद्यांच्या काठावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी सकाळपासून धानेप येथे 49 मिलिमीटर पाऊस पडला. 1 जूनपासून 10 आगस्टपर्यंत 1738 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

तीन दिवसांपासून गुंजवणी धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी पट्ट्यासह घिसर, निवी, कोदापूर, घेंवडे, अंत्रोली भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणातील पाण्याची पातळी सकाळी 98 टक्के झाली, त्यानंतर दुपारपर्यंत धरण शंभर टक्के भरून वाहू लागले. धरण क्षेत्रात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे पाण्याची आवक वाढली आहे. निरा-देवघर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल म्हणाले की, लागोपाठ तीन दिवसांच्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे.

त्यामुळे बुधवारी दुपारी बारा वाजता धरणातून 2288 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा वाढ करण्यात आली. सध्या 3040 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणानुसार नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. गुंजवणी धरणाची पाणी साठवणक्षमता 3.69 टीएमसी इतकी असून, वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातूनही पाणी सोडले जात आहे. नदीपात्रात जादा पाणी सोडले जात असल्याने कानंदी व गुंजवणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Back to top button