लोकनेते बाबूराव पाचर्णे यांचे निधन | पुढारी

लोकनेते बाबूराव पाचर्णे यांचे निधन

शिरूर, पुढारी वृत्तसेवा : शिरूर-हवेलीच्या राजकारणातील एक संघर्ष योद्धा, लोकनेते, माजी आमदार बाबुराव काशिनाथ पाचर्णे (वय. ७१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने पाचर्णे हे त्रस्त होते. त्यांच्यावर काही महिने पुण्यात उपचार घेतल्यानंतर त्यांना काही दिवसांपूर्वी शिरूर येथील बाबूराव नगर येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. या दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यभरातून अनेक मान्यवर भेटून प्रकृतीची चौकशी केली. मात्र उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या पाच दशकाहून शिरूर तालुक्याच्या सक्रिय राजकारणात संघर्ष योद्धा व लोकनेता म्हणून त्यांना ओळखले जायचे. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले पाचर्णे हे कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नसताना ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, घोडगंगा कारखाना उपाध्यक्ष, आमदार अशी उत्तुंग मजल मारली. १९९५ ते २०१९ पर्यंत त्यांनी एकूण सहा विधानसभा निवडणुक लढवल्या. त्यात त्यांनी दोन वेळा विजय मिळवला.

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पश्चात पत्नी मालतीताई, मुलगा राहुल, मुलगी नीलिमा, तीन भाऊ, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. पाचर्णे यांचा शिरूर शहर व पंचक्रोशीत नात्यागोत्यांचा मोठा गोतावळा असून, गेल्या तीन चार दशकांपासून शिरूर शहर व परिसरात पाचर्णे यांचे अनेकांशी घनिष्ट संबंध होते. शहरातील सर्व समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील माणूस गेला असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

Back to top button