पिंपरी : कोरोनापाठोपाठ वाढला स्वाइन फ्लूचाही धोका | पुढारी

पिंपरी : कोरोनापाठोपाठ वाढला स्वाइन फ्लूचाही धोका

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनापाठोपाठ आता स्वाइन फ्लूचाही धोका वाढला आहे. कोरोनाने आज 74 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. तर, दिवसभरात 61 बाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, स्वाइन फ्लूच्या 3 रुग्णांवर सध्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. महापलिकेच्या आकुर्डी येथील रुग्णालयात आज 74 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना 4 तारखेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

त्या व्हेटींलेटरवर होत्या. त्यांना कोरोनाबरोबरच किडनीचाही आजार होता. आज दिवसभरात 705 कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर, 113 रुग्ण कोरोनामुक्त झाले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या 26 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 602 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

स्वाइन फ्लूच्या तीन रुग्णांवर उपचार सुरू
शहरात 1 जानेवारीपासून 10 ऑगस्ट अशा सात महिन्यांच्या कालावधीत 26 संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 15 रुग्ण बाधित आढळले. तर, 2 हजार 815 रुग्णांना टॅमिफ्ल्यू टॅब्लेट देण्यात आली. 15 बाधित रुग्णांपैकी 10 रुग्ण बरे झाले. 3 रुग्णांवर सध्या 2 खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिका वैद्यकीय विभागाकडून त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Back to top button