पानशेत रस्त्याची आमदारांकडून पाहणी; खचलेल्या रस्त्याबाबत त्वरित उपाययोजना करा: भिमाले | पुढारी

पानशेत रस्त्याची आमदारांकडून पाहणी; खचलेल्या रस्त्याबाबत त्वरित उपाययोजना करा: भिमाले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला धरणाच्या खोल पाणलोटालगत असलेल्या सोनापूर -रुळे गावच्या हद्दीवरील पुणे-पानशेत रस्ता खचल्याने धोकादायक बनला आहे. त्याबाबत दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी (दि. 10) या रस्त्याची आमदार भीमराव तापकीर यांच्यासह विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. पाणशेत रस्त्यासह कुरण खुर्द येथील धरणतीरावरील रस्ता, ओसाडेतील दरडी आदी ठिकाणांच्या पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग , जलसंपदा विभाग व विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी आमदार भीमराव तापकीर यांनी खचून धोकादायक बनलेल्या पुणे-पानशेत रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकार्‍यांना केल्या.

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे 11 जुलै रोजी सोनापूरजवळ खडकवासला धरणाच्या खोल पाणलोट क्षेत्रालगत असलेल्या पुलासह रस्त्याचा अर्धा भाग खचला. तेव्हा या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू होती. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या तीरावरील पुलाचा मोठा भाग पुन्हा खचला आहे. त्याबाबतचे वृत्त दै. पुढारीतून प्रसिद्ध होताच आमदारांसह अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

धरणाच्या पाण्याचे प्रवाह वेगाने आदळून रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पूल व रस्ता खचला आहे. एका बाजूला डोंगर व दुसर्‍या बाजूला खडकवासला धरणाचे खोल पाणलोट क्षेत्र आहे. धरणालगतच्या रस्त्याची तज्ज्ञांमार्फत पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदारांनी केली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहिर, कार्यकारी अभियंता अजय भोसले, खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर, भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाजीराव पारगे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या पाऊस असल्याने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. धोकादायक बनलेल्या रस्त्याची तांत्रिक तपासणी करून रस्ता करण्यात येणार आहे.

                                                                बी. एन. बहिर, अधीक्षक अभियंता

 

Back to top button