कर घेता तसे पाणीही द्या; पाणी परिषदेत खडकवासला धरण परिसरातील नागरिकांची मागणी | पुढारी

कर घेता तसे पाणीही द्या; पाणी परिषदेत खडकवासला धरण परिसरातील नागरिकांची मागणी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: खडकवासला परिसरापासून जवळच असलेल्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, कोपरे परिसरामध्ये पाणीटंचाई ही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाचवीलाच पूजली गेली आहे. पाणीटंचाईचे प्राक्तन हटवण्यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून, भरमसाठ कर घेता, मग पाणीही द्या, अशी मागणी केली. पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. निमित्त होते शिवणे येथे आयोजित पाणी परिषदेचे.

खडकवासला धरण परिसरातून धो-धो पाणी वाहत असले, तरी धरणाजवळील शिवणे, उत्तमनगरसह समाविष्ट भागात पाणीटंचाई कायम आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी उपमहापौर दिलीप बराटे व जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांच्या पुढाकाराने पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. खडकवासला राष्ट्रवादीचे त्रिंबक मोकाशी, अतुल दांगट, दिलीप कदम, अतुल धावडे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे म्हणाल्या, ‘शिवणे उत्तमनगर भागातून पालिका कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करत आहे, मात्र पाणीसमस्या दूर करण्यासाठी उपाययोजना होत नाही. शिंदे पुलापासून पुढील भागात वारजे केंद्राच्या नवीन जलवाहिकेतून पाणी दिले जाते, मात्र पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी घोटभरही पाणी मिळत नाही.’

या सोसायट्यांमध्ये नेहमीचीच पाणीटंचाई
शिवणे येथील श्री स्वामी छाया सोसायटी, लक्ष्मी रेसिडेंसी, वृंदावन सोसायटी, शिवतेज अपार्टमेंट, आशीर्वाद गार्डन, आशीर्वाद टेरेस, साई समर्थ निवास, शिंदे पार्क, अथर्व रेसिडेंसी, क्षितिज रेसिडेंसी आदी सोसायट्या तसेच दाट लोकवस्त्यांना वर्षानुवर्षे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याकडे येथील रहिवाशांनी पाणी परिषदेत लक्ष वेधले.

पाणीपुरवठ्याआड तांत्रिक अडचणी
खडकवासला धरणातून थेट पाणी उचलून शिवणे उत्तमनगर, कोंढवे धावडे, कोपरे परिसराला दिले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना नुकतीच पालिकेकडे हस्तांतर केली. अलीकडे लोकसंख्या तीन पटींनी वाढली असल्याने या योजनेचा पाणीपुरवठा कोलमडला आहे. त्यामुळे शिवणे भागात वारजे केंद्रातून जलवाहिका टाकून पाणीपुरवठा सुरू केला आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

Back to top button