पिंपरी : अडीच लाख ध्वज विक्रीचे आव्हान, आतापर्यंत दीड लाख झेंड्यांची विक्री | पुढारी

पिंपरी : अडीच लाख ध्वज विक्रीचे आव्हान, आतापर्यंत दीड लाख झेंड्यांची विक्री

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने चार लाख कापडी (सिल्क) राष्ट्रध्वजाची विक्री केली जाणार आहे. आतापर्यंत 1 लाख 50 हजार ध्वजांची विक्री झाली असून, शुक्रवार (दि.12) एका दिवसात तब्बल 2 लाख 50 हजार ध्वजांच्या विक्रीचे आव्हान पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसमोर आहे. त्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पालिकेच्या वतीने शनिवार (दि.13) ते सोमवार (दि.15) असे तीन दिवस ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्यासाठी पालिकेने 24 रूपये दराने 3 लाख राष्ट्रध्वज खरेदी केले आहे. त्यासाठी 72 लाख खर्च अपेक्षित आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन विभागीय कार्यालयाकडून अतिरिक्त 1 लाख ध्वज खरेदी करण्यात आले आहेत. शहरातील विविध तीन पुरवठादार गुजरात तसेच, दिल्ली, मथुरा येथून टप्पाटप्प्याने ध्वज आणून देत आहेत.

आतापर्यंत एकूण 2 लाख 44 हजार 800 ध्वजाचा पुरवठा झाला आहे. त्यातील 40 हजारांपेक्षा अधिक ध्वज पालिकेच्या भांडार विभागाने परत केले आहेत. ध्वजाचा आकार 20 इंच बाय 30 इंच आहे. मात्र, त्यांचा आकार कमी असणे, शिलाई योग्य नसणे, रंगरंगतीमध्ये तफावत असणे, राष्ट्रध्वज नियमसंहितेनुसार ध्वज अयोग्य असणे या कारणांमुळे ते ध्वज नाकारण्यात आले.

पुरवठादारांना तातडीने ध्वज पुरवठा करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. माल उपलब्ध होताच ते तपासून घेऊन, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या विक्री केंद्रांना उपलब्ध करून दिले जात आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 50 हजार ध्वजांची विक्री झाली आहे. येत्या दोन दिवसात तब्बल 2 लाख 50 हजार ध्वजाची विक्री पालिकेस करावी लागणार आहे. गुरूवारी (दि.11) पालिकेस सुटी आहे. केवळ एका दिवसात इतक्या ध्वजाची अधिकारी व कर्मचार्‍यांना विक्री करण्याचे आव्हान आहे.

Back to top button