पुणे : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका | पुढारी

पुणे : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आर्थिक व्यवहारातून सात वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. तर, मुख्य सूत्रधार महिलेसह तिघींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या ती फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. याबाबत क्रांतीनगर, हनुमान टेकडी, ता. लोणावळा येथील 21 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. अपह्रत मुलीची पोलिसांनी मोहोळ येथून सुखरूप सुटका केली. ही घटना 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वारगेट बसस्थानक परिसरात घडली होती. फिर्यादी व मुख्य सूत्रधार महिला यांत आर्थिक व्यवहार होते. दोघी नातेवाईक आहेत. त्यातूनच तिघींनी फिर्यादीच्या सात वर्षीय बहिणीचे अपहरण केले.

फिर्यादी या पंढरपूर येथे नातेवाइकाकडे निघाल्या होत्या. त्या वेळी आरोपी महिला व त्यांची भेट झाली. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने स्वारगेट पोलिसांत अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी दोघा महिलांना कात्रज परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेली चौकशी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुख्य सूत्रधार महिला मोहोळ कधी पंढरपूर येथे असल्याचे पोलिसांना कळाले. मात्र, पोलिस मागावर असल्याचे महिलेला कळताच तिने मुलीला आपल्या आई-वडिलांच्या गावी सोडून पळ काढला. त्यांनी त्या मुलीला मोहोळ पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलगी सुखरूप मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी दिली.

Back to top button