पुणे: एंजल मिनी मिकी शाळेच्या 5 स्कूलबस जप्त, पहाटे 5.30 वाजता आरटीओ अधिकाऱ्यांनी केले ऑपरेशन | पुढारी

पुणे: एंजल मिनी मिकी शाळेच्या 5 स्कूलबस जप्त, पहाटे 5.30 वाजता आरटीओ अधिकाऱ्यांनी केले ऑपरेशन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: हडपसर येथील एंजल मिनी मिकी शाळेत अनधिकृतरित्या शालेय वाहतूक करणार्‍या 5 स्कूल बस आरटीओकडून बुधवारी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याच शाळेची 1 स्कूल बस मंगळवारी शाळेच्या आवारातच जळून खाक झाली होती. त्या पार्श्वभुमीवर आरटीओकडून ही कारवाई करण्यात आली.

शहरात अनेक खासगी वाहनांमधून अनधिकृतरित्या शालेय वाहतूक करण्यात येत आहे. यासंदर्भात दै.‘पुढारी’मध्ये सातत्याने वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. याचवेळी या शाळेत सुरू असलेली अनधिकृत शालेय वाहतूकीच्या बसने पेट घेतला. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे जिवित हानी टळली. या ठिकाणी आणखी पाच गाड्यांकडून सुरू असलेल्या अनधिकृत शालेय वाहतूकीबाबत देखील वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत आरटीओ अधिकार्‍यांनी बुधवारी पहाटे 5.30 वाजताच शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या 5 गाड्या जप्त केल्या. या जप्त केलेल्या गाड्या शेवाळवाडी डेपो येथे पार्क करण्यात आल्या असून, गाडी मालकावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच, गाडी मालकाला या गाड्या पुन्हा शालेय वाहतूकीस न वापरण्यास सांगण्यात आले आहे.

गाडी मालकाकडून लिहून घेणार

जप्त केलेल्या गाड्या या काँट्रॅक्ट कॅरेज परमिटवरील आहेत. त्यांचा वापर गाडी मालकाने अनधिकृतरित्या विना परवाना शालेय वाहतूकीसाठी केला. त्यामुळे आरटीओने ही कारवाई केली. या गाड्या दंडात्मक कारवाईनंतर पुन्हा शालेय वाहतूकीसाठी वापरणार नाही, असे आरटीओ अधिकारी या गाडी मालकाकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार आहे.

Back to top button