पुणे-नाशिक रस्त्यावर मंचरमध्ये ट्रकवर कारवाई | पुढारी

पुणे-नाशिक रस्त्यावर मंचरमध्ये ट्रकवर कारवाई

मंचर, पुढारी वृत्तसेवा : मंचर शहरातील जुना पुणे- नाशिक रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकवर वाहतूक समस्येमुळे मंचर पोलिसांनी कारवाई केली.

जुना पुणे- नाशिक रस्त्याच्या कडेला दिवसभर मोठ्या प्रमाणात ट्रक उभ्या राहात होत्या. ट्रकमुळे वाहनचालक, प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. महत्त्वाची बाजारपेठ असलेले मंचरमध्ये याठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने भीमाशंकरकडे जाणारे अनेक भाविक शहरातून जात असतात, त्यामुळे गर्दीत वाढ झाली आहे.

संभाजी महाराज चौक परिसरात या रस्त्याच्या कडेला अनेक चारचाकी मालवाहतूक ट्रक दिवसभर उभे राहून ये-जा करणार्‍यांना अडथळा निर्माण करतात. परिणामी गांधी विद्यालय, अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिकांना मोठा त्रास होत होता. अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. त्यामुळे या ट्रकचा बंदोबस्त करावा, असे निवेदन भाजप महिला मोर्चा मंचर शहरच्या वतीने जागृती महाजन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मंचर पोलिस ठाण्याला दिले होते. यावर तातडीने कार्यवाही करत मंचर पोलिसांनी सदर रस्त्यावरील मालवाहतूक ट्रकवर कारवाई सुरू केली आहे. मंचर पोलिसांच्या कारवाईचे शहरातील नागरिक आणि प्रवाशांकडून स्वागत होत आहे.

Back to top button