...अन् ती सुखरूप घरी परतली!; परीक्षेतील अपयशामुळे सोडले होते घर | पुढारी

...अन् ती सुखरूप घरी परतली!; परीक्षेतील अपयशामुळे सोडले होते घर

भिगवण, पुढारी वृत्तसेवा : डिप्लोमा परीक्षेत आलेल्या अपयशामुळे तिला नैराश्य आले. यातूनच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, नातेवाईक, एसटी आगाराचे कर्मचारी, हॉटेल मालक आणि भिगवण पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे ती नुकतीच पुन्हा सुखरूप घरी परतली.

करमाळा येथील एक मुलगी डिप्लोमा शिक्षण घेत होती. या डिप्लोमाचा नुकताच निकाल लागला. यामध्ये ती अनुत्तीर्ण झाली. यामुळे तिला नैराश्याने ग्रासले. यातून तिने कशाचाही विचार न करता घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि करमाळा येथून ती भूम-स्वारगेट एसटी बसमध्ये बसली.

याबाबत नातेवाईकांना कुणकुण लागताच त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान, ती बसमध्ये गेल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यांनी लगेच ही माहिती एसटी डेपो, पोलिस प्रशासनाला दिली. तसेच या मुलीचा फोटो, नाव, पत्ता व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करण्यात आला. साहजिकच सर्वजण सतर्क झाले होते. इंदापूर डेपोमार्फत एसटी चालक, वाहक व एसटी थांब्यावरील हॉटेल मालकांना सतर्क करण्यात आले होते.

अखेर ही योजना कामी आली आणि डाळज हद्दीत असणारे हॉटेल उदयचे मालक समीर मुलाणी यांना एका एसटी बसमध्ये ही मुलगी दिसली. त्यांनी त्याबाबत भिगवण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने या मुलीला ताब्यात घेतले. यानंतर दिलीप पवार व महिला पोलिस दीपाली खेत्रे यांनी तिचे समुपदेशन केले. त्यानंतर भिगवण येथे तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Back to top button