पुणे : भोर-आंबाडखिंड घाटात दरड कोसळली | पुढारी

पुणे : भोर-आंबाडखिंड घाटात दरड कोसळली

भोर, पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर – आंबाडखिंड घाटात मंगळवार (दि. 9) सकाळी अकराच्या सुमारास दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभाग, आंबाडे ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील दरड बाजूला करून वाहतूक सुरुळीत करण्यात आली.

भोर – मांढरदेवी महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गावरील आंबाडखिंड घाटात पुन्हा जोरदार सुरू झालेल्या पावसामुळे दरड कोसळली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेने तसेच आंबाडे येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज खोपडे, सोपान खोपडे तसेच प्रकाश जाधवर यांनी दगडी तसेच रस्त्यावर आलेला राडाराडा त्वरित बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला, असे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.

मांढरदेवी, वाई, महाबळेश्वर तसेच पाचगणी या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आंबाडखिंड घाट जवळचा मार्ग असल्याने पर्यटकांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. सध्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने डोंगर माथ्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. घाट रस्त्यावर काही धबधबे खळखळून वाहत असल्याने पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. पर्यटकांनी सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन मेटेकर यांनी केले आहे.

Back to top button