पुणे : वीर धरण शंभर टक्के भरले | पुढारी

पुणे : वीर धरण शंभर टक्के भरले

निरा, पुढारी वृत्तसेवा : निरा खोर्‍यातील धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वीर धरण मंगळवारी (दि. 9) सकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. दरम्यान, वीर धरणाच्या तीन दरवाजांतून तसेच कालव्याच्या विद्युतगृहातून असे एकूण 24 हजार 385 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने विसर्ग निरा नदीत सुरू असल्याची माहिती वीर धरणाचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी दिली.

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पावसाच्या वाहून येणार्‍या पाण्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत राहिली. त्यामुळे मंगळवारी सकाळी नऊ वाजता वीर धरणाच्या पाचवा दरवाजा साडेचार फुटाने उचलून धरणातून 4 हजार 637 क्युसेकने विसर्ग निरा नदीपात्रात सुरू होता. तसेच धरणात पाण्याची आवक वाढत असलेने विसर्गामध्ये वाढ करून मंगळवारी दुपारी चार वाजता एकूण तीन दरवाजांतून 13 हजार 911 क्युसेकने तसेच निरा उजवा कालव्याच्या विद्युतगृहातून 800 क्युसेकने व निरा डावा कालव्याच्या विद्युतगृहातून 300 क्युसेकने विसर्ग निरा नदीपात्रात सुरू आहे. वीर धरणातून एकूण 15 हजार 11 क्युसेकने विसर्ग निरा नदीत सोडण्यात आला.

मंंगळवारी (दि.9) सायंकाळी चार वाजता निरा देवघर धरणात 8.985 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून धरण 76.60 टक्के भरले आहे. भाटघर धरणात 19.170 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, धरण 81.57 टक्के भरले आहे. वीर धरणात 9.408 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून धरण 100 टक्के भरले आहे. तर गुंजवणी धरणांत 3.426 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून धरण 92.85 टक्के भरले आहे. दरम्यान, वीर धरणातून विसर्ग सुरू असल्याने निरा नदीकाठच्या गावांतील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button