बकोरी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था | पुढारी

बकोरी रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : बकोरी गावाला जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथून जाणार्‍या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत असून रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बकोरी रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. बकोरीलगत असलेला वाघोली हा परिसर बाजारपेठेच्या दृष्टीने खूप मोठा आहे.

याठिकाणी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कृषी साहित्य विक्री केंद्र मोठ्या प्रमाणात असल्याने बकोरीतून वाघोलीमध्ये ये-जा करणार्‍यांची संख्या मोठी आहे. वाघोली व बकोरीला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने तो सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. नागरिकांसह विद्यार्थ्यांना, वाहनधारकांना विशेषतः दुचाकीधारकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून जावे लागते. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांना अपघाताला सामोरे जाणे नित्याचेच झाले आहे. परिणामी, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सूर्यकांत जाधव यांच्या वतीने संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.

Back to top button