पुणे : सोसायट्यांवरही ‘तिरंगा’ नियोजनासाठीच्या बैठका सुरू | पुढारी

पुणे : सोसायट्यांवरही ‘तिरंगा’ नियोजनासाठीच्या बैठका सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशभक्तीपर गीतांच्या तयारीत रमलेली लहान मुले… सोसायट्यांमध्ये, घरोघरी सुरू असलेले ध्वजाचे वाटप… सोसायट्यांमध्ये सुरू असलेल्या नियोजनासाठीच्या बैठका… कुठे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुरू असलेली तयारी… अशा पद्धतीने सोसायट्यांमध्ये, घरोघरी ‘हर घर तिंरगा’ उपक्रमाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. ध्वज वाटपासह स्वातंत्र्यदिनासाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन झाले असून, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा, यासाठी जल्लोषपूर्ण वातावरणात प्रत्येकजण कामाला लागला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्यातंर्गत सगळीकडे या उपक्रमाचा आनंद दिसून येत असून, शहरातील विविध सोसायट्यांमध्ये आणि घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट या तिन्ही दिवशी ध्वज फडकणार आहे. सोसायट्यांमध्ये अन् घरोघरी तर तयारी सुरूच आहे, पण तरुणाईही तयारीला लागली आहे. सामाजिक संस्थेत काम करणारे तरुण असो वा नोकरदार तरुणाई…प्रत्येकात एक उत्साह पाहायला मिळत असून, देशभक्तीपर गीतांपासून ते देशभक्तीपर नृत्यापर्यंतची तयारी…तरुणाईने केली आहे.

औंध येथील नियोशी पार्क 4 सोसायटीच्या अध्यक्ष प्रीती शिरोडे म्हणाल्या, ‘आम्ही आमच्या सोसायटीसह इतर सोसायट्यांमध्ये ध्वज वाटप करत आहोत. या दृष्टीने तयारी सुरू असून, सोसायटीमध्ये प्रत्येक घरी ध्वज लावण्यात यावा, यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील सनसिटी सोसायटीचे उपाध्यक्ष समीर रूपदे म्हणाले, ‘गेल्या आठवड्याभरापासून आम्ही ध्वज वाटप करत असून, आमच्या सोसायटीसह इतर घरांमध्येही ध्वज वाटप करत आहोत.’

पुण्यात 18 हजार हाउसिंग सोसायट्या आणि 15 हजार अपार्टमेंट आहेत. महासंघाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यासंदर्भात सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन केले असून, याबाबत सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. काही सोसायट्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, लोक तयारीला लागले आहेत. उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे.
                     – सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ

 

आम्ही मित्रांनी एकत्र येऊन घरोघरी ध्वज लावण्यात यावा, यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आम्ही खास पोस्टही टाकणार आहोत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने नक्कीच घरोघरी ध्वज लावलाच पाहिजे.
                                            – शुभम पाडवी, नोकरदार तरुण

 

Back to top button