पिंपरी : तोतया पोलिसांकडून 14 दुचाकी जप्त | पुढारी

पिंपरी : तोतया पोलिसांकडून 14 दुचाकी जप्त

पिंपरी : बनावट ओळखपत्र बनवून शहरातून दुचाकी चोरणार्‍या दोन तोतया पोलिसांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तसेच, त्यांच्याकडून दुचाकीचोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले असून 6 लाख 96 हजार रुपये किमतीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौकात ही कारवाई करण्यात आली. दीपक नारायण बनसोडे (31 रा. थॉमस कॉलनी, देहुरोड), श्रीमंत विनायक सुरवसे (29, रा. गुरुव्दारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) चिंचवड अशी अटक आरोपींची
नावे आहेत.

पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलिस हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार रोहीत पिंजरकर व उमेश वानखडे यांना माहिती मिळाली की, दोन दुचाकी चोरटे गुरूव्दारा चौक वाल्हेकरवाडी थांबले आहेत. त्यानुसार, तपास पथकाने घटनास्थळी सापळा रचून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती चोरीची आसल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत पोलिस ओळखपत्र व पोलिस गणवेश मिळून आला. अधिक तपासात वाहनचोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरलेली 6 लाख 96 हजार रुपये किमतीची 14 वाहने जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, शंभु रणवरे, कर्मचारी पांडुरंग जगताप, आर.बी.नरवडे, धर्मनाथ तोडकर, रोहीत पिंजरकर, उमेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button