पुणे : क्रांतिदिनाचे स्मरण; वीरांना अभिवादन! | पुढारी

पुणे : क्रांतिदिनाचे स्मरण; वीरांना अभिवादन!

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी निर्वाणीची हाक ऑगस्ट क्रांतिदिनी दिली. ‘चले जाव’ व ‘करेंगे या मरेंगे’ या दोन स्फूर्तिदायक घोषणांनी स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याला बळ मिळाले. या अंतिम लढ्याच्या धगधगत्या आठवणींना पुणेकरांनी मंगळवारी विविध ठिकाणी कार्यक्रम, परिसंवाद, व्याख्यान तसेच क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून, पदयात्रा, प्रभातफेरी काढून उजाळा दिला. लढ्यात योगदान दिलेल्या शहिदांना अभिवादन केले.

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट व पुणे महानगरपालिकेच्या वतीने राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीत क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. क्रांतिवीरांची धगधगती गाथा छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहत होते.

संस्था-संघटनांतर्फे विविध कार्यक्रम
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि क्रांतीदिनानिमित्त विविध ठिकाणी प्रभात फेरीचेही आयोजन केले होते. यानिमित्ताने क्रांतिकारकांच्या योगदानाला सलाम करण्यात आला. यानिमित्ताने संस्था-संघटनांच्या वतीने विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

भरपावसात देशभक्तीपर गीते
आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या विविध शाखांच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. 27 गटांमध्ये 2 हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले. देशाभिमान जागृत व्हावा आणि देशभक्तीचे संस्कार त्यांच्यात रुजावे, यासाठी ही फेरी आयोजित केली होती. क्रांतिकारकांच्या वेशभूषा करून विद्यार्थी फेरीत सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी भरपावसातही देशभक्तिपर गीते गात आणि घोषणा देत फेरी पूर्ण केली.

पोवाड्यातून शहिदांना अभिवादन
तहसील कार्यालय पुणे शहरतर्फे क्रांतिदिनानिमित्त मंगळवारी शनिवारवाडा येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सर्व क्रांतिकारकांना पोवाड्याच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्यात आली. शनिवारवाडा येथे आयोजित कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसीलदार राधिका हवळ-बारटक्के उपस्थित होत्या. 13 ते 15 उपजिल्हा निवडणूक अधिकारी सावंत यांनी मतदारांना वोटर हेल्पलाइन अ‍ॅपद्वारे मतदान कार्ड, आधार कार्डशी संलग्न करण्याच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली.

महापालिकेच्या शाळेत अवतरले क्रांतिवीर!
महापालिकेच्या शिक्षण विभाग प्राथमिक संचालित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव क्रीडानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान करून क्रांतिकारकांना सलाम केला. अतिरिक्त आयुक्त (विशेष) विलास कानडे, शिक्षण विभागाच्या (प्राथमिक) प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, क्रीडाप्रमुख राजेंद्र ढुमणे, भूषम बहिरमे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्याक्षिके सादर केली, तर लोकशाहीचा जागर हा संदेश देणारे पथनाट्यही सादर करून मने जिंकली. सारिका गांधी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका गिरीजा तरवडे यांनी आभार मानले.

पदयात्रेतून ‘आझादी’चा गौरव

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबू गेणू स्तंभ, मंडईपर्यंत ‘आझादी गौरव पदयात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.
प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘महात्मा गांधींच्या ‘अंग्रेज चले जाव’ या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागांत बि—टिश साम—ाज्याच्या विरोधात ‘चले जाव’चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासीयांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. 1942 च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाचा ठराव संमत झाला. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासीयांनी करायला पाहिजे.’ यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, अ‍ॅड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते.

Back to top button