पाऊस थोड्या प्रमाणात चालू झाल्याने चारसूत्री भात लागवडीची लगबग | पुढारी

पाऊस थोड्या प्रमाणात चालू झाल्याने चारसूत्री भात लागवडीची लगबग

येळसे : मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. शिळींब हे गाव आज आधुनिक शेती पद्धतीने शेती करत आहेत. बर्‍याच दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते; परंतु आता पाऊस हळुहळु सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी भात लागवड चालू केल्या आहेत. शिळींब गावातील प्रगतिशील शेतकरी व मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार धनवे यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड कृषिसहाय्यक विकास गोसावी व मंडळ कृषी अधिकारी दत्ता शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच एकर क्षेत्रावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पावसाभावी भात लागवडी खोळबल्या होत्या; परंतु आता पाऊस थोड्या प्रमाणात चालू झाल्याने शेतकर्‍यांनी भात लागवड दोरीच्या साह्याने 15 बाय 25 सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड शिळींब, मोरवे, चावसर परिसरात चालू केल्या आहेत. लागवडी नंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चुडाच्यामधे एक गोळी अशा प्रकारे लागवडीनंतर दोन ते तीन दिवसांत लावणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

मजुराचा तुटवडा व यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने व नंतर झालेल्या पावसाने रोपवाटिका नुकसानीमुळे भातरोपे शेतकर्‍यांना कमी पडत आहेत यामुळे लोक आधुनिक लागवडीकडे वळले आहेत यावर्षी बहुसंख्य शेतकरी चारसूत्री पध्दतीने लागवड करत आहेत. शेतकरी भातलावणी करताना दोन ते तीनच भातरोपे लावत आहेत. कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. शिळींब, मोरवे, चावसर या गावात 300 एकर क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड करणार असल्याचे कृषिसहायक विकास गोसावी यांनी सांगितले.

यावर्षी पावसाने जून महिन्यात खंड दिल्याने रोपवाटिका उशिरा उगवल्याने व जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसाने पवनमावळ पश्चिम पट्ट्यात रोपवाटिकाचे थोड्या प्रमाणात नुकसानीमुळे भातलागवडी उशिरा चालू झाल्या आहेत; परंतु आता पुन्हा पाऊस कमी प्रमाणात सक्रिय झाल्याने भात लागवडी सुरू झाल्या आहेत. पश्चिम पट्ट्यात लागवड पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे.
                                       – दत्ता शेटे, मंडळ कृषी अधिकारी, काले कॉलनी

Back to top button