पिंपरी : तर दिव्यांगांचे आर्थिक लाभ बंद होणार! | पुढारी

पिंपरी : तर दिव्यांगांचे आर्थिक लाभ बंद होणार!

पिंपरी : दिव्यांग नागरिकांनी 31 ऑगस्टपर्यंत दिव्यांग सर्वेक्षण केले नाही तर त्यांना देण्यात येणारे आर्थिक लाभ बंद करण्यात येतील, असा इशारा महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिकांनी आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जावून दिव्यांग सर्वेक्षण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यनुसार दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व वैर्श्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्लेक्स, पॅम्पलेट, व्हॉटसअप व फेसबुक मेसेज, बॅनर, ऑडीओ, व्हीडीओ सी.डी., मनपाच्या डिजीटल जाहिरात फलकावर, विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती.

समाज विकास विभागाकडून 10 मे ते 15 जून 2022 पर्यंत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी करणे इ.बाबत शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींची एकूण 8060 एवढी लोकसंख्या आहे. त्यापैकी आज अखेरपर्यंत 3100 इतक्याच व्यक्तींनी दिव्यांग सर्वेक्षण केले आहे.

सर्वेक्षण करुन घेण्याचे आवाहन
31 ऑगस्टपर्यंत उर्वरीत दिव्यांग नागरीकांनी दिव्यांग सर्वेक्षण केले नाही तर त्यांचे देण्यात येणारे आर्थिक लाभ बंद करण्यात येणार आहेत. दिव्यांग नागरिकांनी आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जावून दिव्यांग सर्वेक्षण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

Back to top button