

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावीला पहिल्या फेरीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून केवळ 25 टक्के प्रवेश झाले असून, 27 हजार 190 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. 25 हजार 634 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 हजार 556 विद्यार्थ्यांनी कोटा प्रक्रियेतून अशा एकूण 27 हजार 190 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केला असल्याचे स्पष्टीकरण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून, दुसर्या फेरीचे पसंतीक्रम भरण्यास सुरुवात झाली आहे.
परंतु, पहिल्या फेरीत 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होता. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. अकरावीच्या पहिल्या फेरीसाठी 305 कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 लाख 8 हजार 830 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध होत्या. त्यासाठी कॅपमधून 65 हजार 519 विद्यार्थी पात्र ठरले होते. यातील 42 हजार 349 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. यातील केवळ 27 हजार 860 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कन्सेंट दिला होता. त्यातील 25 हजार 634 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला, तर 62 विद्यार्थ्यांना विविध कारणांसाठी प्रवेश नाकारण्यात आला.
137 विद्यार्थ्यांनी आपला घेतलेला प्रवेश रद्द केला. तर 2 हजार 27 विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. तर 14 हजार 489 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला असतानाही संबंधित विद्यार्थी महाविद्यालयांकडे फिरकलेच नाहीत. कोटाअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत 1 हजार 556 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर 16 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश रद्द केला.