आता प्रत्येक जिल्ह्यात अपंगत्व निदान केंद्र! | पुढारी

आता प्रत्येक जिल्ह्यात अपंगत्व निदान केंद्र!

पुणे: पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाकडून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत (आरबीएसके) प्रत्येक जिल्ह्यात ‘जलद अपंगत्व निदान आणि उपचार केंद्रे (अर्ली इंटरव्हेंशन) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बालकांमधील व्यंगत्वाच्या समस्यांचे थेरपिस्टच्या चमूने जलद उपचार सुरू केल्याने अपंगत्व कमी करण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. भारतात दरवर्षी जन्मलेल्या 27 दशलक्ष मुलांपैकी सुमारे 10 टक्के मुले कोणत्या ना कोणत्या व्यंगामुळे ग्रस्त असतात.

त्यांच्या समस्यांचे निदान लवकर होण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांना अनुसरून, सशस्त्र दलांनी पुणे येथील कमांड रुग्णालयात (दक्षिण कमांड ) पहिले जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्र (ईआयसी) स्थापन केले आहे. आर्मी वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या क्षेत्रीय अध्यक्ष अनिता नैन यांनी रुग्णालयाचे कमांडंट मेजर जनरल एम. एस. तेवटिया यांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन केले.
‘मुलांमध्ये असलेल्या अपंगत्वाच्या विविध पैलूंवर काम करण्यासाठी आणि त्यांना सर्वोत्तम उपचार आणि त्याचे संभाव्य परिणाम सुनिश्चित करण्यासाठी या केंद्रात अनेक थेरपिस्ट – क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, विशेष शिक्षक, पोषणतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. या रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक मुलाची, त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञांकडे आणि आणि बालरोग न्यूरोलॉजी बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येणार्‍या प्रत्येक मुलाची कोणत्याही दोष किंवा अपंगत्वाच्या जलद निदानाच्या अनुषंगाने पूर्ण तपासणी केली जाईल,’ अशी माहिती कर्नल कार्तिक राम मोहन यांनी दिली.

Back to top button