मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नको गणेशोत्सवासाठी महापालिकेची नियमावली तयार | पुढारी

मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नको गणेशोत्सवासाठी महापालिकेची नियमावली तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याची घोषणा राज्यकर्त्यांसह प्रशासनाने एकीकडे केलेली असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी, तसेच मंडळांना अनधिकृत जाहिरात करता येणार नाही.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, पोलिस आणि शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकत्र्यांची सोमवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत जाहिराती हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याचा दावा करीत मंडळांनी यंदा रनिंग मांडवावर बंधने नकोत, यांसह अनेक मागण्या केल्या. दरम्यान, पालिकेने मंडळांनी पाळावयाच्या नियम व अटी-शर्तींची टिप्पणी सर्व मंडळांना दिली आहे. त्यात मंडळांना मंडप, स्टेज, कमानी, रनिंग मंडपावर लावल्या जाणार्‍या जाहिरातींसंदर्भात नियम व अटी टाकल्या आहेत.

रनिंग मंडपावर जाहिराती लावण्यासाठी महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाची अधिकृत परवानगी घ्यावी लागेल; तसेच वाहतूक पोलिस व पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्रासह मुख्य मांडवापासून दोन्ही बाजूला 50 मीटर अंतरापर्यंतच अधिकृत जाहिराती लावता येतील. या अंतरात एकापेक्षा अधिक मंडळे असल्यास त्यांना समप्रमाणात जागा विभागून दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मंडळांना परवानी घेऊनच अधिकृत जाहिराती लावता येतील. मात्र, या पैकी एक पंचमांश भागात महापालिकेच्या उपक्रमांची जाहिरात लावणे मंडळांना बंधनकारक असल्याचेही पालिकेने म्हटले आहे.

…या आहेत पालिकेच्या अटी
स्वागत कमानींची उंची 18 फुटांहून अधिक असावी, मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा अधिक नसावी, अधिकृत परवान्यांची प्रत मंडपात दर्शनी भागात लावावी, मंडळांना करोना प्रतिबंधक नियमांचे पालन आवश्यक राहील, अशा अटीही पालिकेने घातल्या आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर संबंधित मंडळाने तीन दिवसांच्या आत मांडव, देखाव्याचे बांधकाम, साहित्य, रनिंग मांडव, गाडे हटवावेत. त्यानंतर कामासाठी रस्त्यावर खड्डे घेतले असल्यास तीन दिवसांच्या आत हे खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवून जागा पूर्ववत करावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Back to top button