पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्षपद आठ महिन्यांपासून रिक्त असल्याने धर्मादाय आयुक्तांकडील कारवाई टाळण्यासाठी अखेर सप्टेंबरमध्ये अध्यक्ष निवड करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
यासंबंधीचे निवेदन विश्वस्त मंडळाकडून धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहे. अध्यक्षपदाच्या रस्सीखेचात हे पद रिक्त राहिल्याची चर्चा असून, यंदाचा गणेशोत्सव अध्यक्षांविनाच पार पाडावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव शिखर मंडळांचे अध्यक्षपद दगडूशेठ हलवाई गणपतीकडे आहे.
या ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांचे 6 डिसेंबर 2021 मध्ये निधन झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजेच जवळपास आठ महिन्यांपासून या ट्रस्टचे अध्यक्षपद रिक्त आहे. अध्यक्षपदासाठी विश्वस्त महेश सूर्यवंशी, हेमंत रासने यांच्यासह अक्षय गोडसे यांच्यात रस्सीखेच असल्याने अध्यक्षपदाचा पेच कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ट्रस्टचे अध्यक्षपद रिक्त असल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून कायदेशीर कारवाईची टांगती तलवार उभी राहण्याची भीती निर्माण झाली होती.
ही शक्यता लक्षात घेऊन विश्वस्त मंडळाने नुकतेच धर्मादाय आयुक्तांना अध्यपदाची निवड प्रक्रिया 15 सप्टेंबरनंतर घेतली जाणार असल्याचा ठराव केला असून, त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे लेखी निवेदन दिले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी प्रथमच पुन्हा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार असला तरी, दगडूशेठ हलवाई गणपतीचा उत्सव मात्र अध्यक्षांविनाच पार पाडावा लागणार आहे.
रिक्त जागांची चौकशी करणार
दगडूशेठ हलवाई गणपती विश्वस्त मंडळाने सप्टेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया करणार असल्याचे निवेदन दिले आहे. मात्र, विश्वस्त मंडळावरील 14 पैकी 3 विश्वस्तांच्या जागा गेल्या काही वर्षांपासून रिक्त असल्यासंबंधीची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
– सुधीर बुक्के, सहायक धर्मादाय आयुक्त, पुणे.गणेशोत्सवाचे नियोजन वर्षभरापूर्वीच
दरवर्षी गणेशोत्सव झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे नियोजन लगेचच दगडूशेठ हलवाई ट्रस्टकडून केले जाते. त्यानुसार अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या कार्यकाळातच यावर्षीच्या उत्सवाचे नियोजन झाले होते. त्यानुसारच यंदाचा उत्सव साजरा केला जाणार असून, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या नावानेच उत्सव साजरा होणार आहे.
– हेमंत रासने, विश्वस्त, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट.