पिंपरी : ईएसआय रुग्णालयाला सुविधांची प्रतीक्षा

पिंपरी : ईएसआय रुग्णालयाला सुविधांची प्रतीक्षा
Published on
Updated on

दीपेश सुराणा : 

पिंपरी : मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला (ईएसआय) सुपरस्पेशालिटी सुविधांची प्रतीक्षा आहे. रुग्णालयात डोळ्यांवरील मोतीबिंदू व अन्य शस्त्रक्रिया करण्याची सोय तूर्तास उपलब्ध नाही. तसेच, दंतोपचाराच्या सुविधेचा देखील अभाव आहे. रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दररोज 300 ते 350 रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे. मोहननगर येथील रुग्णालयात दररोज पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, लोणावळा, हिंजवडी परिसरातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्याशिवाय, पुण्यातील रुग्ण देखील येथे उपचारासाठी येतात. उद्योग-व्यापार क्षेत्रातील ईएसआय सुविधेचा लाभ घेणार्‍या कामगार, कर्मचार्‍यांसाठी हे रुग्णालय महत्त्वपूर्ण आहे. महिलांची प्रसूती, हाडाच्या शस्त्रक्रिया, अपघात झालेल्या रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार व अन्य शस्त्रक्रियांची सोय आहे. शल्यविशारद, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.

रुग्णांच्या लागतात रांगा
किडनी, हृदयाचे आजार, मेंदुचे आजार, अशा सुपरस्पेशालिटी सुविधांची रुग्णालयात सोय नाही. त्यामुळे त्यावरील उपचारासाठी टायअप झालेल्या खासगी रुग्णालयांत उपचारासाठी पाठविण्यात येते. रुग्णालयात दररोज 300 ते 350 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रांगा लावून रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते.

ऑनलाइन यंत्रणा व अद्ययावत यंत्रसामग्री
रुग्णालयात संगणक यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे रुग्णाची माहिती व त्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती संकलित केली जाते. धन्वंतरी मोड्युलचा वापर त्यासाठी केला जात आहे. त्याशिवाय, रुग्णालयात शस्त्रक्रिया व अन्य उपचारांसाठी आवश्यकतेनुसार नवीन यंत्रणा घेण्यात येते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती पाटील यांनी दिली.

डोळ्यांसाठी स्वतंत्र विभागाचे नियोजन
रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र विभाग प्रस्तावित आहे. हा विभाग सुरू झाल्यानंतर मोतीबिंदू, तिरळेपणा आदी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्याशिवाय, सी-आर्म या यंत्रणेचीही मागणी करण्यात आली आहे.

रुग्णालयासाठी 8 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि नवजात बालकांसाठी 2 खाटांचा एनआयसीयू प्रस्तावित आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. मानसोपचार,त्वचारोग, दंतोपचार आदी सुविधांचे नियोजन आहे. त्यासाठी लवकरच स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे.
– डॉ. भारती पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर.

पोटात दुखत असल्याने मी 6 तारखेला रात्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. येथे चांगले उपचार मिळत आहेत. रुग्णालयात औषधे देखील उपलब्ध होत आहेत.
                                                                             – रूपेश खाडे, रुग्ण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news