पुणे : ध्वजासाठी जुन्या पाईपचा पुनर्वापर | पुढारी

पुणे : ध्वजासाठी जुन्या पाईपचा पुनर्वापर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जुन्नर पंचायत समितीकडून जुन्या पाइप्सचा पुनर्वापर करून त्याचा ध्वजस्तंभ म्हणून उपयोग होणार आहे. जुन्नरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाइपचा उपयोग करून खांब तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जुन्नरने अंमलबजावणीला सुरुवात केली असून, तालुक्यात 325 ठिकाणी या खांबांवर ध्वजारोहण केले जाणार आहे.

जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशनचे काम सुरू आहे. इंधन विहिरीमध्ये (बोअर) अंतर्गत रेट्रोफिटिंग कामांच्यावेळी नादुरुस्त झालेले पाइप काढण्यात आले होते. हे सर्व पाइप जिल्हा परिषदेच्या कोरेगाव पार्क येथील गोदामात पडून होते. प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार गोदामातून पाइप देण्यात येत आहेत. पाइपचा दर्जा चांगला असल्याने त्यांचा पुनर्वापर करण्यात येत आहे. पंधरा फुटांच्या पाइपचे तुकडे करून त्यावर पुली आणि कळस बसविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये याचा उपयोग अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाने, आरोग्य केंद्रांसह इतर शासकीय इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, जलजीवन मिशनच्या काम करताना काढलेल्या या पाइपचा पुनर्वापर होत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार पाइपचा पुनर्वापर करण्यात आला. यामुळे पैशांची बचत झालीच, त्याशिवाय मजबूत ध्वजस्तंभ तयार झाले आहेत. जुन्नरमध्ये 325 ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. त्यामध्ये 210 अंगणवाडी, 20 पशुवैद्यकीय दवाखाने, 70 प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र, 10 वनविभाग, 4 सहाय्यक निबंधक कार्यालय, तर 11 इतर शासकीय कार्यालयांसाठी देण्यात येत आहेत.
                                              शरदचंद्र माळी, गटविकास अधिकारी, जुन्नर

Back to top button