पुणे : पानशेत परिसरातील रस्त्यांची चाळण | पुढारी

पुणे : पानशेत परिसरातील रस्त्यांची चाळण

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : कुरण खुर्द (पानशेत) फाटा ते कादवे रस्त्यासह पानशेत, वरसगाव धरण परिसरातील रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह पर्यटकांची गैरसोय होत आहे.

वेल्हेकडे जाणार्‍या कादवे घाट,वरघड आदी ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घटत आहेत. अतिवृष्टीत मोठ्या दरड कोसळल्या होत्या. धोकादायक दरडी, तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासन गंभीर नाही. रस्त्यांसाठी निधी मंजूर असताना प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होत असल्याचे श्री शिरकाई देवस्थानचे सचिव अमोल पडवळ यांनी सांगितले.

पावसाचा जोर सध्या ओसरला आहे. मात्र रिमझिम सुरू आहे. त्यामुळे पाणी साठून खड्डे मोठे होत आहेत. पानशेत येथील कुरण खुर्द फाट्यापासून कादवेपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. अशीच स्थिती पानशेत ते घोल, कादवे ते पोळे रस्त्यांची देखील झाली असल्याचे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.

रस्त्यांसाठी खासगी मालकांनी प्लॉटिंगसाठी तोडलेल्या डोंगराच्या दरडी ठिकठिकाणी कोसळत आहेत. तसेच धरण भागातील रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद व धोकादायक बनला आहे. एसटी बसचालकांना या रस्त्यांवरून मोठी कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

परिसरात पर्यटकांची वर्दळ

पानशेत परिसरात शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते. खड्ड्यांतून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या भागात धरणाचे पाणलोट क्षेत्र, तसेच खोल दरी आहे. बहुतेक धोकादायक ठिकाणी संरक्षित कठडे नाहीत. कादवे रस्त्यावरून धरणात मोटर कोसळून काही महिन्यांपूर्वी दुर्घटना घडली होती. त्यामुळे अशा दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

Back to top button