पिंपरी : दोन वर्षांनी गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी; शहरात दहीहंडी फुटणार जोरात | पुढारी

पिंपरी : दोन वर्षांनी गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी; शहरात दहीहंडी फुटणार जोरात

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटामुळे दहीहंडी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी सण साजरे करण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच शहरात निवडणुकांचे वातावरण असल्याने यंदा शहरात दहीहंडी जोरात फुटणार असून गोविंदांना लाखोंचे लोणी चाखायला मिळणार आहे. दोन वर्ष कोरोनामुळे कलाकारांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये उदासीनतचे वातावरण होते. यंदा शहरात पिंपरीगाव, भोसरी, वाकड आणि इतर ठिकाणी दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळेल.

दहीहंडीच्या या उत्सवाविषयी बोलताना शहरातील आयोजक मंडळांनीही यंदाचा दहीहंडीचा उत्सव जोरात करणार असल्याचे सांगितले आहे. दरवर्षीप्रमाणे हिंदी व मराठी कलाकारांना दहीहंडीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यासाठी दहीहंडी मंडळांमध्ये आतापासूनच चुरस लागलेली आहे. दहीहंडीच्या ठिकाणी गर्दी खेचून आणण्यासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाणार आहे. गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, दहिहंडी फोडण्याची एकमेकांत वाढणारी चुरस, गाण्यांच्या स्वरात थिरकणारे तरुण, असे वातावरण यावर्षी दिसणार आहे.

Back to top button